Rohit Pawar on Ajit Pawar : अजित पवारांचा टोला , रोहित पवारांची टीका
Rohit Pawar on Ajit Pawar : अजित पवारांचा टोला , रोहित पवारांची टीका लोकसभेत बारामतीकर धर्मसंकटात सापडला होता. एकीकडे होते सुप्रिया सुळे म्हणजे शरद पवार तर दुसरीकडे होते सुनेत्रा पवार म्हणजे अजित पवार. बारामतीकर 35 वर्ष आपल्यासोबत आहे, तो आपल्या कामाला साथ देईल या भ्रमात दादा होते. पण बारमतीकरांनी आपलं वजन जुन्या जाणत्या शरद पवारांच्या पारड्यात टाकलं आणि अजितदादा सावध झाले. बारामतीकरांना गृहीत न धरता दादा आता वाड्या,वस्त्या, गाव, खेडी पालथी घालत आहेत. मतदारांना आपलंसं करायचा प्रयत्न आहेत. दादांची ही विविध रुपं सध्या प्रचारा दरम्यान पाहायला मिळत आहेत. विधानसभा निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गावभेटी देत जोरदार प्रचार करत आहेत. गावभेटीदरम्यान भाषणात अजितदादांची तुफान फटकेबाजी पाहायला मिळतेय. या भाषणात दादांची अनेक रुप महाराष्ट्राला नव्यानं पाहायला मिळत आहेत. शरद पवारांनी आपल्यावर कसा अन्याय केला हे अजितदादांनी अत्यंत खुबीने मतदारांना सांगितलं आहे. मुलीनंतर आता डायरेक्ट नातूच उभा केला शरद पवार आणि बारामतीकरांच्या इमोशनल कनेक्टबद्दल अजितदादा जाणून आहेत. त्यामुळेच सहानुभूतीला बळी पडू नका असं आवाहन दादा करत आहेत. यावेळी काकांच्या पक्षपातीपणावर दादांनी टीका केली. लोकसभेला मुलीनंतर आता साहेबांनी थेट नातूच निवडणुकीच्या रिंगणात उभा केला असं दादा म्हणाले. सोबत आपल्याला आव्हान देणाऱ्या पुतण्या युगेंद्रलाही चिमटे काढले. मी इंग्रजी येत नसतानाही राज्याचा अर्थसंकल्प मांडला. युगेंद्रला टिंबही लिहायला येतंय का बघा असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला. मोदींनी पवारसाहेबांवर टीका टाळली ते बरं केलं दादा जे मनात असेल ते बोलून दाखवतात. त्या स्वभावाला जागत त्यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. अर्थात यावेळी त्याचं कारण थोडं वेगळं होतं. हे कौतुक होतं मोदींनी शरद पवारांवर वैयक्तिक टीका करणं टाळलं यासाठी. अशा टिकेचा लोकसभेला कसा फटका बसला होता हे सुद्धा दादांनी मान्य केलं. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे सगळं सांगण्याचा मूळ उद्देश अजितदादांनी अजिबात लपवून ठेवला नाही. सलग सात टर्म बारामतीकरांनी दादांवर विश्वास टाकला आहे. तो यावेळीही कायम ठेवतील अशी अपेक्षा ते करतायत. बारामतीचा आणखी विकास करण्याची क्षमता आपल्याकडेच आहे असं सांगायला ते विसरत नाहीत. पवारसाहेब राजकारणापासून दूर गेल्यानंतर हा पठ्ठ्याच बारामतीचा विकास करणार, आपलं नाणं तसं खणखणीत असल्याचं वक्तव्य अजितदादांनी या आधीच केलं होतं. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे हे अजितदादा मान्य करतात. लोकसभेत बारामतीकरांनी दिलेल्या झटका दिल्यानंतर दादा सावध झाले आहेत. बारामतीकरांवर शरद पवारांचा असलेला प्रभाव किमान विधानसभेपुरता तरी कमी व्हावा यासाठी अजित पवार प्रयत्न करत आहेत. लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला अजितदादा या प्रथेला बारामतीकर जागतील अशी आशा अजित पवार करत असतील.