Monsoon : कोकण,मराठवाड्यात तुफान पाऊस, रायगडसाठी उद्या रेड अलर्ट, रत्नागिरी-सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानं पेरणी झाल्यानंतर आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात पुढील पाच दिवस दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
कोकणातील काही जिल्ह्यात सतत पावसामुळं अनेक नद्यांना पूर आला असून त्यामुळं काही गावांमध्ये पाणी शिरलं आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरु असल्याची माहिती आहे.
कणकवलीतील खारेपाटणमध्ये पूरजन्य परिस्थिती, शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून खारेपाटण गावात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेली काही दिवस पावसाने दडी मारल्यानंतर रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली असून नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर चिंताग्रस्त असलेला कोकणातील शेतकरी या पावसामुळे काहीसा सुखावला असून शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर घेतला आहे.
खारेपाटण येथे पूरपरिस्थिती मुळे शुक नदीपात्राचे पाणी खारेपाटण शहरात घुसले असून यामुळे खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे पुराचे पाणी आले असून खारेपाटण बाजारपेठ मधून बंदरवाडी व सम्यकनगर कडे जाणार रस्ता पुराच्या पाण्याच्या खाली गेला आहे. त्यामुळे येथील लोकवस्तीचा संपर्क तुटला आहे. तर खारेपाटण मासळी मार्केट इमारतीला पुराच्या पाण्याने वेढले आहे.
याचबरोबर खारेपाटण बाजारपेठेतून कालभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला असून येथील वाहतूक बंद आहे. खारेपाटण मधील बिगे व भाटले येथील शेती पाण्याखाली गेली असून सुमारे 5 फूट पेक्षा अधिक पाणी शेत पिकात घुसले उभे पीक पाण्याखाली गेले आहे. खारेपाटण चिंचवली मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद झाली आहे.