Rats in Hospital | नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. एका महिला रुग्णाच्या अंगावरून चक्क उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयात एका वयोवृद्ध रुग्णाच्या पायाला उंदराने कुरतडल्याचा प्रकारही समोर आला होता. या घटनेमुळे रुग्णालयातील उंदरांच्या साम्राज्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. या गंभीर प्रकारानंतर आरोग्यमंत्री याकडे लक्ष देणार का आणि दोषींवर कारवाई करणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.