Rajiv Khandekar News : एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आता एबीपी न्यूजचेही मुख्य संपादक
एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या खांद्यावर एबीपी न्यूजच्या मुख्य संपादकपदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे यांनी नुकतीच ही घोषणा केली. एबीपी नेटवर्कच्या वृत्त आणि निर्मिती विभागाचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडंट या नात्यानं राजीव खांडेकर हे एबीपी माझासोबत एबीपी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक म्हणूनही जबाबदारी सांभाळतील. एबीपी नेटवर्कचे सीनियर व्हाईस प्रेसिडंट संत प्रसाद राय हे खांडेकरांच्या मार्गदर्शनाखाली एबीपी न्यूजच्या कामकाजात लक्ष घालतील. राजीव खांडेकर यांच्या गाठीशी आजवर पत्रकारितेतला तब्बल ३३ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीच्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी त्यांनी गेली १५ वर्षे यशस्वीरित्या सांभाळली आहे. २००७ साली एबीपी माझात रुजू होण्याआधी खांडेकर यांनी सकाळ आणि लोकसत्ता या मराठी दैनिकांसह ई टीव्ही या वाहिनीच्या वृत्तविभागातही महत्त्वाच्या पदांवर काम पाहिलं आहे.