Raj Thackeray : जो पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार
Raj Thackeray Press Conference : मशिदीवरील भोंग्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजपासून आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही उपस्थित केलेला मुद्दा हा सामाजिक असून धार्मिक नाही असे म्हणत मला दंगल भडकवायची असती तर संभाजीनगरमधील सभेत भडकवली असती असे राज ठाकरे यांनी म्हटले.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. राज यांनी म्हटले की, हा सामाजिक विषय आहे, याला धार्मिक वळण जर त्यांनी दिला तर आम्हीही धार्मिक वळण देऊ. शांतता बिघडावी अशी आमची अजिबात इच्छा नाही. संभाजीनगरमध्ये माझं भाषण सुरु असताना बांग दिली गेली, त्यावेळी हे मी पोलिसांना सांगितलं, अन्यथा भडकवायचं असतं तर तिथे काय झालं असतं सांगा? असा प्रश्ननही त्यांनी उपस्थित केला. आम्ही शांततेत सांगतो, तर पोलिसांनी आणि सरकारने ऐकून घ्यावं असं आव्हानही राज ठाकरे यांनी केले.