Raj Thackeray Full PC : ...तर राज्यात मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवारांनी घ्यावी
Raj Thackeray Full PC : ...तर राज्यात मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवारांनी घ्यावी
महाराष्ट्रात आगामी काळात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली होती. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) यांनीच महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये, असे खोचक वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. राज ठाकरे हे सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रात मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीबाबत भाष्य केले.
शरद पवार हे महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करतात. याबाबत तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय, याबाबत नेमकं काही समजत नाही, अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली. यापूर्वी भाजपच्या नेत्यांना मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाला शरद पवार यांचे पाठबळ असल्याचे आरोप केले होते. आता राज ठाकरे यांनीही याच भूमिकेची री ओढली आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी शरद पवार यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, ही चर्चा सुरु असतानाच आता राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीयवादासाठी पुन्हा एकदा शरद पवार यांनाच जबाबदार धरले आहे. त्यामुळे आता यावर शरद पवार काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.