Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मला
Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या 8 ते 10 दिवसांपासून विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ सभांचा धडाका लावला आहे. या सभांच्या माध्यमातून ते मनसेच्या (MNS) उेमदवाराला विजयी करण्याचं आवाहन जनतेला करत आहेत. आता, निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून पुढील काही दिवासांत मोठ्या-मोठ्या सभा होणार आहेत. त्यात, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरही सभा होणार आहे. मात्र, राज ठाकरेंनी (Raj Thackeray) तब्येत ठीक नसल्याने मनसेच्या पुढील सभा होतील की नाही, हे अद्याप तरी निश्चित नाही. भिवंडी येथे मनसेच्या उमेदवारांसाठी आज राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, राज ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी सभेसाठी व्यासपीठावर जाण्याचे टाळत थेट ज्या ठिकाणी जाहीर सभेसाठी आलेले मनसैनिक बसलेले त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. माझी प्रकृती ठीक नसल्याने मी पुढे सुद्धा अशाच पद्धतीने फक्त भेटी घेण्यासाठी जाणार आहे, कुठे पुढच्या जाहीर सभेमध्ये मी भाषण करणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
मी तुमचं दर्शन घेण्यासाठी इथे आलो, माझी थोडीशी तब्येत ठीक नाही. त्यामुळे, मी भाषण न करता आपली भेट घेऊन जाईल, माझे सहकारी तुम्हाला ते सांगतील. पण, येत्या 20 तारखेला कुणीही गाफील राहू नका, आपले मित्र-परिवार आणि नातेवाईक यांना सांगून आपल्या मनसेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केलं. तसेच, वणवण फिरणं, बडबड करणं हे काहीवेळाला अंगलट येतं. पण, आपण सर्वजण समजून घ्याल अशी अपेक्षा, पण या उमेदवारांच्या विजयानंतर मी लवकरच आपल्या भेटीला येईल, असे म्हणत राज ठाकरेंनी सभास्थळावरुन काढता पाय घेतला. त्यामुळे, येथील उमेदवार व सभेसाठी गर्दी केलेल्या मनसैनिकांची काहीशी निराशा झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, राज ठाकरे यांच्या यापुढील सभा होणार की नाही, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.