Latur Farmers | लातूरमध्ये दुबार पेरणीचं संकट, पावसाची दडी, शेतकरी हवालदिल
गेल्या अठ्ठावीस दिवसांपासून राज्यात पावसाने खंड घेतला आहे. मान्सूनपूर्व पावसानं लातूर जिल्ह्याला जलमय केले होते, मात्र त्यानंतर मृग नक्षत्र आणि अद्र नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले. आता सुरू असलेले पुनर्वसू नक्षत्रही कोरडेच जात आहे. सकाळी थोड्या सरी पडल्या तरी त्यानंतर पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. यामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत, कारण फुलधारणेच्या वेळीच पावसाने पाठ फिरवली आहे. याचा सर्वात मोठा फटका सोयाबीनच्या उत्पादनावर होणार आहे. लातूर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. येत्या काही दिवसांत योग्य पाऊस न झाल्यास बहुतांश ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. दुबार पेरणी न झाल्यास हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक वाया जाण्याची भीती आहे. यासाठी एकरी दहा ते पंधरा हजार रुपयांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. निसर्ग कोपला असेल तर काय करावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. हिंगोली जिल्ह्यातही मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यापूर्वी झालेला पाऊसही हलक्या स्वरूपाचा होता. हिंगोली जिल्ह्यात जवळपास ऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.