ABP News

Rahul Solapurkar : शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी

Continues below advertisement

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी त्याविषयी माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, तसा विचार कधीही मनात येणार नाही असं ते म्हणाले. आग्र्याहून सुटका करताना शिवाजी महाराजांनी लाच देऊन स्वतःची सुटका केली होती असं वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये केलं होतं. त्यानंतर राज्यातील विविध संघटनांनी, इतिहास अभ्यासकांनी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. 

राहुल सोलापूरकर म्हणाले की, दीड दोन महिन्यापूर्वी मी एक मुलाखत दिली. त्या दरम्यान, इतिहास आणि इतिहासातील रंजक गोष्टी कशा बनतात याबद्दल वक्तव्य केलं होतं. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कशी झाली याबद्दल मी वक्तव्य केलं. तसा संदर्भ काही इतिहासकारांनी लिहून ठेवला आहे. पण माझ्या या पूर्ण मुलाखतीमधील ते दोन वाक्य वापरून काही लोकांनी वाद निर्माण केला. शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं माझ्या मनातही येणार नाही. 

त्या मुलाखतीमध्ये बोलताना मी लाच हा शब्द वापरला. त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो असं राहुल सोलापूरकर म्हणाले. साम, दाम, दंड, भेद या तत्वानुसार शिवाजी महाराजांनी काम केलं. त्याविषयी बोलताना महाराजांचा अपमान करण्याचा हेतू कुठेही नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं.  

गेली अनेक वर्ष मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये राहुल सोलापूरकर काम करत आहेत. 'राजर्षी शाहू' मालिकेत त्यांनी साकारलेली शाहू महाराजांची भूमिका बरीच गाजली होती. पण याच सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वादाचा पिक्चर सुरू झाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram