Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी, रस्त्यावर पाणीच-पाणी!
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून विविध जिल्ह्यात मुसळधारा (Rain) कोसळत आहेत. हवामान विभागाने दिलेले अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही (Vidarbha) दमदार पावसाने एंट्री करत एकच दाणादाण उडवली आहे. आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील जवळ-जवळ सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाजही हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर, आज पुणे (Pune), रायगड, सांगली, बेळगाव, गोंदिया जिल्ह्यासंह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून शहरातील रस्त्यांवरुन पाणी वाहताना दिसून येते.
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पुण्यातील विविध परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसून आलं. अनेकांनी लागलीच पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आडोसा घेतला होता. 11 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वीही पुण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला होता. शहरातील धानोरी, कात्रज, विमान नगर परिसरात पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं.
खासदार बैठक घेणार
यंदाच्या पावसाने नागरिकांचं नुकसान होणार नाही आणि रस्ते तुंबणार नाही, याची काळजी घेणार असून यासंदर्भात लवकरच प्रशासनाची बैठक घेणार असल्याचं नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. खासदार होताच पहिल्याच दिवशी पुण्यातील पावसावर मोहोळ यांनी आश्वासन देण्यात आलं आहे.
गोंदियात पाऊस तुफान झोडपतोय
गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसापासून नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले होते. मान्सूनचे आगमन केव्हा होणार याची प्रतीक्षा नागरीक करत होते, काल मृग नक्षत्राच्या प्रारंभातच पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांना उकडापासून निश्चितच दिलासा मिळाला होता. मात्र, आज दुपारी पुन्हा उन्हाचा तडाखा बसला, त्यानंतर संध्याकाळी अचानक विजेच्या कडकडासह आलेल्या पावसामुळे वातावरण थंड झाला असून मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने आता शेतीच्या कामाला वेग येणार आहे.
शहादा तालुक्यातही मुसळधार
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी गावच्या परिसरातील या वादळी वाऱ्याने मोठा फटका बसला असून याठिकाणच्या केळीच्या बागांना या पावसाचा तडाखा बसला आहे. या वादळी वाऱ्यासह पावसात या गावच्या परिसरातील अनेक शेतीमधील केळीच्या बागा आडव्या झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक केळीच्या बागांमध्ये तोडणीला आलेल्या केळीचा झाडे घडांसहीत कोलमडून पडली आहेत. गावातील झाडांसहीत वीजेच्या खांब देखील या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात उन्मळून पडल्याच चित्र समोर येत आहे. त्यामुळे, परिसरातील वीज पुरवठा देखील प्रभावीत झाल्याचे चित्र आहे.