Pune Rain | खडकवासला धरणातून २५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, भिडे पूल पाण्याखाली
पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या तासाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे जवळपास शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून सध्या पंचवीस हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात सुरू आहे. यापूर्वी अडीचशे क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. शहराच्या मध्यवर्ती डेक्कन परिसरातील मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीलगतचे रस्ते आणि बाबा भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाकडून नदीलगतच्या गाड्या लवकरात लवकर काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, नागरिकांना नदीच्या जवळ न जाण्याचे आवाहन महानगरपालिका आणि पोलिसांनी केले आहे. अनेक पुणेकर नागरिक मुठा नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.