राज्यात घरगुती इलेक्ट्रिक मीटर होणार स्मार्ट! मोबाईलसारखे प्रिपेड-पोस्ट पेड रिचार्ज करता येणार
मुंबई : घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडींग बाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला आहे. घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या महानगरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले आहेत.
स्मार्ट मीटर योजनेबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी याबाबत आज निर्देश दिले. राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या निर्देशानुसार दुरुस्ती करण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी दिल्या.
या बैठकीत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक(वित्त) रविंद्र सावंत, महावितरणचे कार्यकारी संचालक अरविंद भादीकर उपस्थित होते.