Prakash Mahajan : ज्यांच्यासाठी लढले, विरोधकांना भिडले, त्या Raj Thackeray यांच्यावर घणाघाती टीका
धाराशिव : मनसेची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला. माझा थोडं वय वाढलं आहे आणि काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात. त्यामुळे मी थांबायचे ठरवले आहे. माझा बाकी कोणावर राग नाही असे त्यांनी पक्ष सोडल्यानंतर म्हटले होते. मात्र, आज पहिल्यांदाच त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाचा व्यापक दृष्टिकोनातून विचार करावा, त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा का सोडला कळत नाही?, असे म्हणत पहिल्यांदाच मनसेप्रमुखांना लक्ष्य केलं. गंगेतील स्नान आणि पाण्याच्या मुद्द्यावर जाहीर व्यासपीठावरुन राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेचा व्हिडिओ दाखवत प्रकाश महाजनांची थेट मनसेवर टीका केली. मन शुद्ध नसेल तर बिसलेरीच्या पाण्याची अंघोळ देखील गटारीच्या पाण्याची वाटू शकते, असा खोचक टोलाही लगावला.
नरेंद्र मोदी देशात आल्यानंतर हिंदूंकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला आहे. पण, उद्धव ठाकरे यांनी ब्राह्मण समाजाला चिडवण्यासाठी टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. शरीरावर चिटकलेल्या त्वचेसारखं राज ठाकरेंचं हिंदुत्व, अशी व्याख्या मी केली. मात्र, आता महानगरपालिकेतील मतांसाठी राज ठाकरेंनी मवाळ भूमिका घेतली, अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली.