
Political Holi | रंगांच सण, रंगावरूनच राजकारण; धुलवडीच्या उत्सवात रंगांची वाटणी Special Report
होळी हा सर्वांनी एकत्र येऊन रंग खेळण्याचा सण...
असा सण जिथं कुठलाही रंग मोठा नसतो आणि कुठलाही रंग छोटा नसतो.
सर्व रंग एकत्र येण्याचा हा आनंदाचा सण.
मात्र राजकारणी लोक रंगांच्या या सणातही कसा आपापला रंग शोधून घेतात, याची प्रचिती यंदा सर्वांनाच आली.
आकाशातील इंद्रधनुष्यापासून ते जमिनीवर फुलणाऱ्या फुलांपर्यंत सर्व रंगांची उधळण आपण नेहमीच पाहतो.
मात्र आपल्या नेत्यांना एकमेकांच्या चेहऱ्यावर रंग लावतानाही सोयीचे रंगच कसे आठवतात, ते या निमित्तानं दिसून आलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज आपल्या कुटुंबीयांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत होळीच्या रंगांची मुक्त उधळण केली.
मात्र माध्यमांना प्रतिक्रिया देण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांना एकच रंग आठवला.
((आमचा रंग भगवा आहे. हा रंग ज्यांना परवडेल, ज्यांना आवडेल त्यांनी आमच्यासोबत यावं. भगवा रंग हा सनातन हिंदुत्वाचा रंग आहे. हा रंग वैश्विक रंग आहे. हा रंग सर्वसमावेशक आहे. तो द्वेष करायला शिकवत नाही. ))
भगव्या रंगाचं शिवसेनेकडून इतकं कौतुक होत असेल, तर भाजपकडून किती व्हायला पाहिजे, या प्रश्नाचं उत्तर भाजपच्या बुजुर्ग नेत्याच्या तोंडूनच महाराष्ट्राला मिळालं.
शिवाय भगव्या रंगात हिरव्या रंगाचं मिश्रण झालं, तर काय होतं...
मनात एक रंग आणि चेहऱ्यावर एक रंग लावला तर काय होतं..
अशा सर्व प्रकारची उदाहरणं देत त्यांनी भगव्या रंगाचा उदोउदो केला.
आणि उद्धव ठाकरेंना टिमटासुद्धा काढला...
((कोणता रंग राजकारणात गडद करायचा, हे राज्यातील जनतेच्या हाती आहे. कोणता रंग फिका करायचा, कोणता गडद करायचा हे जनता ठरवते. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भगवा रंगच चालणार, हे इथल्या जनतेनं दाखवून दिलं. काहीजण वरून भगवा आणि पोटात हिरवा रंग घेऊन आले. त्यांना नाकारलं.))
तर भगव्या आणि हिरव्याच्या वादात न पडता तिरंगा हाच आपला आवडता रंग असल्याचं राष्ट्रीय उत्तर आव्हाडांनी देऊन टाकलं.
महायुतीचे नेते भगव्याचा गवगवा करत हिरव्याला नाकं मुरडत असताना महाविकास आघाडीचे नेते तीन रंगांवरच आपलं प्रेम असल्याचं सांगत होते.
((आमचा तिरंगी आहे, जो भारताचा आहे. आणि तोच आमचा रंग आहे.))
कुणाला एकच रंग आवडला, कुणाला तीन रंग आवडले, तर कुणाला एक रंग खटकल्याचं आजच्या राजकीय प्रतिक्रियांवरून दिसून आलं.
महाराष्ट्रातले राजकीय पक्ष आणि नेत्यांनी गेल्या पाच वर्षात स्वतःच इतके रंग बदललेत की त्यांचा मूळ रंग आणि आत्ताचा रंग यात बराच फरक पडलाय.
महाराष्ट्रात पाच वर्षांपूर्वी असणाऱ्या मूळ चार रंगांचे आता सहा रंग झाले असून या सहापैकी तीन-तीन रंगांच्या दोन जोड्या झाल्या आहेत.
आपापल्या रंगांचा अभिमानानं उल्लेख करणारे महाराष्ट्रातले नेते उद्या त्याच रंगासोबत राहतात का, असा प्रश्न जनतेला नक्कीच पडला असेल.
भविष्यात आपले नेते 'कुठले' रंग धारण करतात, 'किती' रंग उधळतात आणि 'कसे' रंग बदलतात, याकडं जनतेचं लक्ष असणार आहेच.
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.