PM Modi Palghar Visit : पंतप्रधान मोदी आज पालघर दौऱ्यावर, 5000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त
PM Modi Palghar Visit : पंतप्रधान मोदी आज पालघर दौऱ्यावर, 5000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त
जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. हे बंदर भारतातील सर्वांत मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, शुक्रवारी मुंबई आणि पालघरच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील बीकेसी येथील जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ला ते भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते पालघरला रवाना होणार असून, पालघर येथील सिडको ग्राऊंड येथे वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन करणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. हे बंदर भारतातील सर्वांत मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असणार आहे. या बंदराच्या कामाचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय, मोदी यांच्या हस्ते मत्स्यव्यवसायासंबंधी २१८ प्रकल्पांचे भूमिपूजनही केले जाणार आहे. सुमारे १५६० कोटी रुपयांचे हे प्रकल्प असल्याचे सांगितले जाते. या उपक्रमांमुळे मासेमारी क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढेल, तसेच पाच लाख रोजगार निर्माण होतील, असे सांगण्यात आले. एकात्मिक ॲक्वापार्क, रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम आणि बायोफ्लॉक यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. हे प्रकल्प देशातील विविध राज्यांमध्ये राबवण्यात येणार असून याद्वारे मत्स्यउत्पादन वाढवणे, मासेमारी-पश्चात व्यवस्थापन सुधारणे तसेच या क्षेत्रात सहभागी असलेल्या लाखो लोकांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करणे यासाठी पायाभूत सुविधा तसेच उच्च दर्जाची सामग्री पुरवली जाईल. मासेमारी बंदरांसह, मत्स्य साठवणूक केंद्रे, अद्ययावतीकरण, मासळी बाजार आदी महत्त्वाच्या मत्स्यव्यवसायसंबंधी पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात येईल.