Narendra Modi Birthday : पंतप्रधान मोदींचा 75 वा वाढदिवस, महाराष्ट्रभर विविध सामाजिक कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून त्यांचा पंचाहत्तरवा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी आज मध्यप्रदेश दौऱ्यावर असून 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' आणि 'आठवा राष्ट्रीय पोषण महिना' या योजनांसह अनेक विकासकामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत ट्रम्प यांचे आभार मानले. 'मित्रवरीय अध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या फोन कॉल आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. भारत आणि अमेरिकेचा जागतिक भागीदारी एका उंचीवर नेण्यासाठी तुमच्याप्रमाणेच मीही कटिबद्ध. युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी तुमच्या प्रयत्नांनाही पाठिंबा,' असे मोदींनी म्हटले. राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीत एक कोटी रुपये निधीतून 'नमो उद्यान' विकसित करण्याची घोषणा केली. पुण्यामध्ये खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावतीने एक हजार ड्रोन्सचा भव्य ड्रोन शो आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील सीएसएमटी, चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांसह अन्य ठिकाणी शायना एनसी यांच्याकडून मेगा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. 'नवा भारत सांस्कृतिक महासत्ता' या विषयावरील प्रदर्शनही भरवण्यात आले आहे.