PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
मुंबई : "केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या (Farmers) पाठीशी ठाम उभे आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हफ्त्याचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यापूर्वी राज्य शासनाने ही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भरीव रक्कम वितरित करण्याचं काम केलं आहे. या नवीन 21 व्या हप्त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लागवड, बियाणे, उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी आवश्यक असे तातडीचे आर्थिक बळ मिळणार आहे." अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray bharne) यांनी दिली.
केंद्र सरकारच्या महत्वाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांसाठी 21 वा हप्ता आज वितरीत करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता देशातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मदत होणार आहे. PM-KISAN योजना शेतकऱ्यांना निश्चित वार्षिक उत्पन्न सहाय्य मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. योजनेनुसार पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. ही मदत रु. २,००० च्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट DBT माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा केली जाते.