Sanjay Jadhav | मला जीवे ठार मारण्यासाठी 2 कोटींची सुपारी : शिवसेना खासदार संजय जाधव

परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी सुपारी एका बड्या व्यक्तीने दिल्याची माहिती समोर येत आहे. संजय जाधव यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तब्बल दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार खासदार संजय जाधव यांनी परभणीच्या नानलपेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

खासदार संजय जाधव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, नांदेड येथील रिंदा गॅंगला तब्बल दोन कोटी रुपये देऊन त्यांना संपवण्याचा कट रचण्यात आला आहे. यासाठी परभणीतील एका बड्या व्यक्तीने हे दोन कोटी रुपये देऊन त्यांची सुपारी दिल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. नांदेड रिंदा गॅंग ही पंजाबवरून ऑपरेट करण्यात येते. अतिशय गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या गॅंगला ही सुपारी देण्यात आल्याने परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान रात्री उशिरा खासदार संजय जाधव यांनी नानलपेठ पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने परभणीचे पोलीस अधीक्षक जयकुमार मीना यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. ही चौकशी समिती या तक्रारीची पूर्ण माहिती घेऊन त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola