Param Bir Singh vs Anil Deshmukh | गृहमंत्री अनिल देशमुख यांची हकालपट्टी करा : किरीट सोमय्या

Continues below advertisement

मुंबई : मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप, गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं आढळल्याप्रकरणी एनआयएने एपीआय सचिन वाझे यांना अटक केली. त्यानंतर परमबीर सिंह यांचीही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी लोकमत आणि एबीपी माझाच्या मुलाखतीत गृहमंत्र्यांना मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी का केली असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी अनिल देशमुख म्हणाले होते की, "परमबीर सिंह यांची बदली रुटीन नव्हती. एनआयएच्या तपासात काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांकडून काही अक्षम्य चुका झाल्या ज्या माफ करण्यासारख्या नव्हत्या."  

याच मुलाखतीचा उल्लेख करत परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे की, "सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर गेल्या काही महिन्यात फंड जमा करण्यासाठी अनेकदा बोलावलं होतं. फेब्रुवारीच्या दरम्यान या भेटी झाल्या. अशा भेटीदरम्यान अनेकद एक-दोन स्टाफ मेंबर आणि देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास 1 हजार 750 बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील काही बाबींचा समावेश होता. ज्यातून प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. म्हणजेच महिन्याकाठी 40-50 कोटी रुपये जमा होतील. उर्वरित पैसे हे इतर बाबीतून मिळवता येतील, असं म्हणता येईल."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram