Pankaja Munde Corona Positive: पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण;ताई काळजी घे, धनंजय मुंडे यांची पोस्ट
बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असून या संबंधित माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. पंकजा मुंडे यांनी आपण विलगीकरणात असल्याचं सांगितलंय. तर 'ताई लवकर बरी हो' अशी भावनिक साद बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घातली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलंय की, "माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी त्या संदर्भात खबरदारी घेत आहे. मी या आधी अनेक कोरोनाबाधित लोकांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे, त्यामुळेच मला लागण झाली असेल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी. काळजी घ्या".
पंकजा मुंडेच्या या ट्वीटवर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या."