Pankaja Munde : वारशासोबतच संघर्ष आणि कारस्थानही माझ्या वाट्याला, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
लातूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गोपीनाथ मुंडेंनी जिवंतपणे आपला वारसदार घोषित केल्यामुळे संघर्ष आणि कारस्थान आपल्या वाट्याला आल्याचे त्यांनी सांगितले. "फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत, नेहमी सबर्जेसर राजकारण करायचं" अशी शिकवण वडिलांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले. स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही आणि महाराष्ट्रातील दीन दलित पीडित लोकांना स्वाभिमान देण्यासाठी मुंडेसाहेबांनी आयुष्य वेचले असेही त्या म्हणाल्या. वारस्यामध्ये संघर्ष आणि कटकारस्थाने आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष बनवण्यात गोपीनाथ मुंडेंचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. दाऊदला थेट सभागृहात आव्हान देण्याचे धाडस गोपीनाथ मुंडेंमध्ये होते असेही मुख्यमंत्री म्हणाले. धनंजय मुंडे यांनीही स्वर्गीय मुंडेसाहेबांना संघर्ष योद्धा म्हटले. सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी संघर्ष केला असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.