EXCLUSIVE | धनंजय मुंडे प्रकरणावर काय म्हणाल्या पंकजा आणि प्रितम मुंडे
औरंगाबाद : जातीनिहाय जनगणना हवी अशी आमची मागणी असल्याचं मत औरंगाबादमध्ये बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. गोपिनाथ मुंडे यांची गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी जातीनिहाय जनगणनेची मागणी होती. यासंदर्भात त्यांनी संसदेत वेळोवेळी प्रश्नही उपस्थित केले होते. खासदार प्रीतम मुंडे यांनीही यासंदर्भात वेळोवेळी मागणी केली आहे. त्यामुळे सध्या जनगणना जवळ आली असून ती जातीनिहाय व्हावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच या जनगणनेमुळे समाजाला न्याय देण्यास मदत होईल, असंही त्या म्हणाल्या आहेत. तसेच यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे प्रकरणावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "धनंजय मुंडे प्रकरणाचा विषय मागे पडला आहे. नैतिक, कायदेशीर आणि तात्विक दृष्ट्या या गोष्टींचे समर्थन मी करु शकत नाही. तरी अशा गोष्टीने कुटुंबाला त्रास होतो. नातं म्हणून आणि महिला म्हणून मी या गोष्टीकडे संवेदनशीलपणे पाहते. हा विषय कुणाचाही असता तरी, राजकीय भांडवल केलं नसतं आणि करणारही नाही. बाकी इतर गोष्टींचा निकाल भविष्यात लागलेच."