पंढरपूर-पुणे पालखी मार्गावर रुंदीकरणाचं काम सुरु; प्राचीन बाजीराव विहीर नामशेष होण्याच्या मार्गावर

देश विदेशात पुरातन वस्तू आणि वास्तूला आपल्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक म्हणून त्यांचं जतन केलं जाते. मात्र, वारकरी संप्रदायाच्या नावाने सुरु असणाऱ्या विकास कामात वारकरी संप्रदायाचे वैभवच नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दुर्दैवी चित्र पंढरपूर-पुणे या संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर समोर आले आहे. 
पंढरपूर-पुणे या संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरु असून हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आहे. या मार्गावर वाखारी येथे पुरातन अतिशय सुबक पद्धतीने बांधलेली बाजीराव विहीर ही वास्तू आहे. या पालखी मार्गावरून पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना या विहिरीत उतरून हातपाय धुणे व पाणी पिण्यासाठी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी ही बांधल्याचे सांगण्यात येते. आजही याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे होणारे उभे व गोल रिंगण बाजीरावाच्या विहिरीचे रिंगण म्हणून शेकडो वर्षांपासून प्रसिद्ध आहे.
सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागातर्फे वारकऱ्यांना सहा पदरी पालखी मार्गावरून येता यावे यासाठी नव्याने संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे काम सुरु करण्यात आले आहे. याच मार्गावर अधिकाऱ्यांनी सर्वे करताना ही बाजीरावाची विहीर पाडून त्यावरून गावासाठी बनविण्यात येणारा सर्व्हिस रोड नेण्याची तयारी सुरु केली आहे. आता थेट हे काम ही बांधीव विहीर पाडण्यापर्यंत येऊन ठेपल्यावर ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायाने आक्रमक होत हे काम बंद पाडले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola