Pandharpur Lockdown : पंढरपूर तालुक्यातील 21 गावांमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन : ABP Majha
पंढरपूर तालुक्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणाऱ्या 21 गावांत 14 दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच ज्या गावांत 10 किंवा 10 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण असतील ते संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. तालुक्यातील ग्रामीण भागातील लकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेबाबत सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी श्री. गुरव म्हणाले, लॉक डाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहतील. विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सर्व दुकानदार , व्यापारी, फळे व भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते यांच्यासह इतर व्यावसायिकांची आठवड्यातून कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मोहिमेत चाचण्या वाढविण्यासाठी ‘नो टेस्ट नो रेशन’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. कोरोना संसर्गावर नियत्रंण मिळविण्यासाठी नागरिकांनीही सामाजिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले.