COVID-19 Vaccine | आनंदाची बातमी... कोरोनावरील संभाव्य लस वाटपासाठीची तयारी सुरु
येत्या काही दिवसात कोरोनावर लस उपलब्ध होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य पातळीवर लस वाटप कशी करायची याची तयारी सुरु झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे देखील गेल्या काही दिवसांपासून तुलनेनं कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसात लस आली तर त्यासाठी शीत साखळी कुठे आहे? प्राथमिक आरोग्य केंद्र किती आहेत? ग्रामीण रुग्णालय किती? उपजिल्हा रुग्णालयात लस देणाऱ्या व्यक्तीचे नाव काय? मोबाईल क्रमांक काय? पर्यवेक्षक कोण असेल ? लस देण्याचे ठिकाण कुठलं असेल? त्याचा पिन कोड नंबर काय? ही सगळी माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे.
काही दिवसात कोरोनावर लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लस साठा आणि शीत साखळीची माहिती संकलित करण्याचे आदेश माता बाल संगोपन व शालेय आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. आरोग्य विभागाच्या या पूर्वतयारीच्या आदेशामुळे लवकरच लस उपलब्ध होईल असा आशेचा किरण दिसू लागला आहे.