Non-veg rush | श्रावणापूर्वी नॉनव्हेजसाठी पुणेकरांची झुंबड!
येत्या गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी, आखाड महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने पुणे शहरातील मटण आणि चिकन मार्केटमध्ये मोठी गर्दी झाली आहे. सकाळी सहा वाजल्यापासूनच पुणेकरांनी नॉनव्हेज खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. अनेक ठिकाणी दुहेरी रांगा लागल्याने वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. पुणेकर आज मटण बिर्याणी आणि चिकन खिमा यांसारख्या पदार्थांची तयारी करत आहेत. एका नागरिकाने सांगितले, “आज आमच्या घरी मटन बिर्याणीचा बेत आहे आणि आज शेवटचा रविवार असल्यामुळे आणि इथं खूप चांगलं मटण मिळत असल्यामुळे खूप गर्दी आहे. आखाडातला शेवटचा रविवार आहे त्यामुळे बेत हा एकदम बक्कम आहे घरी सध्या.” प्रत्येकजण किमान एक किलो तरी मटण घेऊन जात असल्याचे चित्र आहे. काही जण पाच किलोपर्यंत मटण खरेदी करत आहेत. आखाड महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने पुणे शहरातील अनेक दुकानांबाहेर अशीच गर्दी दिसून येत आहे. आज प्रत्येकाच्या घरी नॉनव्हेजचा बेत असणार आहे.