Nepal Bus Accident : महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बसचा नेपाळमध्ये अपघात

Continues below advertisement

Nepal Bus Accident :  महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बसचा नेपाळमध्ये अपघात 

 नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात एक भारतीय प्रवासी बस मर्स्यांगडी नदीत कोसळून अपघात झाला आहे. नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. जिल्हा पोलीस कार्यालय तनहुचे डीएसपी दीपकुमार राय यांनी माहिती दिली की, यूपी एफटी 7623 क्रमांकाची बस नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये तब्बल 40 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. 

अपघातानंतर मदत आणि बचाव कार्यात 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 16 जखमी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. तसेच, त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबलेल्या भारतीय प्रवाशांना घेऊन ही बस काठमांडुकडे रवाना झाली होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये सर्व भारतीय प्रवासी प्रवास करत होते.

जखमी स्थानिक रुग्णालयात दाखल 

स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी मदतकार्य सुरू केलं आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक वृत्तानुसार, बस नदीत नेमकी कशी कोसळली याचा शोध सुरू आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनानं आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. बचावकार्य आणि मदतकार्याला प्राधान्य दिलं आहे.

नेपाळमध्ये घडलेल्या दुःखद घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये चिंतेची लाट पसरली आहे. प्रशासन आणि बचाव पथक या दुर्घटनेच्या सर्व परिस्थितीचा सखोल तपास करत असून पीडित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram