Navi Mumbai : नवी मुंबईत एकनाथ शिंदे-गणेश नाईकांमध्ये पुन्हा संघर्षा? प्रभाग रचनेवरुन मोठा वाद
नवी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी उशिरा जाहीर झालेली प्रभाग रचना एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्षाचे नवे कारण ठरत आहे. महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी रात्री १११ सदस्यसंख्या असलेल्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा हरकती आणि सूचना मागविण्यासाठी जाहीर केला. मात्र, ही प्रभाग रचना नियमांना धरून नसल्याच्या तक्रारी गणेश नाईक समर्थक करत आहेत. या आखणीत ठाण्याचा प्रभाव असल्याचा आरोप नाईक समर्थकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, "हा डाव आपल्याला माहिती आहे आणि मी तो उधळून लावेन," असे गणेश नाईक यांनी बैठकीत बोलून दाखवल्याचे वृत्त आहे. यामुळे शिंदे आणि नाईक यांच्यात आरपारची लढाई होण्याची चिन्हे दिसत आहेत. नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात या प्रभाग रचनेवरून मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळात या संघर्षाचे पडसाद महापालिका निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.