Nagpur HMPV Virus Cases : नागपूरमध्ये दोन मुलांना एचएमपीव्हीची लागण, घरी उपचार घेऊन दोघे बरे झाले
Nagpur HMPV Virus Cases : नागपूरमध्ये दोन मुलांना एचएमपीव्हीची लागण, घरी उपचार घेऊन दोघे बरे झाले
नागपुरातही आढळले एचएमपीव्हीचे 2 रूग्ण, खोकला आणि ताप असलेल्या दोन लहान मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह, हॉस्पिटलमध्ये दाखल न करताही दोन्ही बाधित बरे झाल्याची डॉक्टरांची माहिती.
HMPV Virus : चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसनं शिरकाव केल्याने जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. या पाठोपाठ नागपूरमध्ये (Nagpur) देखील एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
प्रकाश आबिटकर यांनी एबीपी माझाही बोलताना म्हटले आहे की, याबाबत आपण एक बैठक बोलावली आहे. हा विषाणू यापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. फक्त चीनमध्ये त्याची संख्या झपाट्याने वाढल्याने चीनने काळजी घेण्याचे काम केले आहे. आपल्याकडे याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. आपली संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आरोग्य विभाग नागरिकांना योग्य त्या सूचना देतील. नागरिकांनी काळजी घ्यावी, घाबरण्याचे काहीही कारण नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
लोकांची जनजागृती करणे महत्त्वाचे
कोरोनाकाळात रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच आयसोलेशन वॉर्ड उभारण्यात आले होते. यंदाही कोरोना सारखी तयारी केली जात आहे का? असे विचारले असता केंद्र शासनाने कालच निर्देश जारी केलं आहेत. राज्यातील आरोग्य विभाग त्याच पद्धतीने कामकाज करत आहे. सध्या विलगीकरण्याची आवश्यकता नाही. तर लोकांची जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन नागरिकांनी करावे. आरोग्य विभागाच्या सूचना आज किंवा उद्या जाहीर होतील, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.