MVA Meeting : मविआतल्या 'या' घडामोडी काय सांगतात? Maharashtra Election 2024
MVA Meeting : मविआतल्या 'या' घडामोडी काय सांगतात? Maharashtra Election 2024
Vidhan Sabha Election 2024 : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार की, काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसून काहीतरी बिनसलंय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच मातोश्रीवर शिवसेना नेत्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी 12.30 वाजता बैठक पार पडणार आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा तिढा सोडवला जात आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी बोलावली मातोश्रीवर नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असून 288 जागांवर लढण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांच्या वतीनं मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावल्याची माहिती मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात काहीसं बिनसलं होतं. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे नाना पटोले नाराज झाले होते. पण, त्यानंतर मतभेद दूर झाल्याचंही महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं. अशातच आता ठाकरेंनी बोलवलेल्या तातडीच्या बैठकीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीवर दबावाची खेळी तर नाही ना? की खरंच वेगळा मार्ग निवडण्याचा ठाकरेंचा विचार आहे, अशा चर्चा सध्या दबक्या आवाजात मातोश्रीवर सुरू आहेत.