Mumbai Rains | ठाणे-बेलापूर हायवेवर पाणीच पाणी, सबवे बंद, वाहतूक वळवली
ठाणे बेलापूर हायवेवरील महापे सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या ठिकाणी चार ते पाच फुटांपर्यंत पाणी आले आहे. त्यामुळे महापे सर्कल येथील सबवे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना सध्या वळसा घालून दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. सबवे बंद झाल्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. ठाण्याहून सीबीडीकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आली आहे. मुसळधार पाऊस अजूनही सुरू असल्याने पाणी अद्याप निघालेले नाही. "संध्याकाळपर्यंत आहे रात्रीपर्यंत हे पाणी असंच राहण्याची शक्यता आहे," असे सांगण्यात आले. वाहतूक पोलिसांनी हा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.