Mumbai :मालाड मैदानाच्या नामकरणाचा वाद चिघळण्याची शक्यता, झाशीची राणी लक्ष्मीबाई नामकरणाचा प्रस्ताव

मुंबईत मालाड इथल्या मैदानाच्या नामकरणाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. मालाडच्या मालवणी इथल्या टिपू सुलतान मैदानाचं झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान असं नामकरण करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत मंजूर झालाय. या नामकरणासंदर्भात आयुक्तांच्या अभिप्रायानंतर नामकरणाची पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल. मालाडमधल्या सर्व नगरसेवकांसह शिवसेनेच्या विभागाप्रमुखांनीही या मैदानाच्या नामकरणासाठी पत्र दिलंय. या मैदानाच्या टिपू सुलतान अशा वादग्रस्त नामकरणावरून झालेल्या वादानंतर शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी मैदानाच्या झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान अशा नामकरणाचा मुद्दा लावून धरला. त्यामुळं या मैदानाच्या नामकरणाचा प्रस्ताव बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत मंजूर झाला. स्थानिक आमदार तसंच मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी या मैदानाचं टिपू सुलतान असं नामकरण केलं होतं. त्यावरून मोठा वाद झाला होता. टिपू सुलतानाच्या नावाला भाजपकडूनही तीव्र विरोध झाला होता.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola