Kuldip Vasu : प्रहारचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांनी फसवणुकीचे आरोप फेटाळले, सरकार करणार SIT चौकशी
अकोट तालुक्यातील जळगाव नहाटे येथील रामेश्वर साबळे या शेतकऱ्याला आपली ज्वारी हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्याला विकावी लागली. त्यांचा नंबर लवकर न लागल्याने त्यांना तीन हजार पाचशे रुपयांच्या हमीभावावर पाणी सोडावे लागले. या प्रकरणात व्यापाऱ्यांनी बोगस सातबारा उताऱ्यांचा वापर करून ज्वारीची खरेदी केल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या नावावर फसवणूक केल्याचा आरोप प्रहारचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांच्यावर झाला आहे. मात्र, वसू यांनी हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत फेटाळले आहेत. दरम्यान, विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. या घोटाळ्याची कार्यपद्धती अशी आहे की, ज्वारीचा पेरा न केलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा वापरून त्यावर फोटोशॉपच्या माध्यमातून ज्वारीचा पेरा दाखवला जातो. त्यानंतर ज्वारी पिकवलेल्या शेतकऱ्यांकडून पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल दराने ज्वारी खरेदी करून तीच ज्वारी शासनाला तीन हजार पाचशे रुपये हमीभावाने विकली जाते. तब्बल पाच हजार शंभर सत्तावीस क्विंटल ज्वारीची अशा प्रकारे खरेदी करण्यात आली असून, यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संयुक्त निबंधकांकडे चौकशी सुरू असून, त्यांचा अहवाल अठरा तारखेला सादर होणार आहे. पणन मंत्र्यांनी सांगितले की, "एक एसआयटी लावली तर एसआयटी देखील याच्यामधून लावण्यात येईल आणि काही चुकीचं झालं असेल तर कडक कारवाई करण्यात येईल." आता या एसआयटी चौकशीत कोणावर जबाबदारी निश्चित होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.