Medical Exam: वैद्यकीय परीक्षा ऑफलाईनच! विद्यार्थ्यांना RTPCR टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक!
नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Corona Update) वैद्यकीय परीक्षा (Medical Exam) ऑफलाईन होणार असल्याचं निश्चित झालं आहे. या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना RTPCR टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक असणार आहे. हा नियम राज्यात 173 कॉलेजेसचे 44000 डॉक्टर होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. पहिल्या पेपरपर्यंत शक्य झाले नाही तर दुसऱ्या पेपरच्या आत मात्र टेस्ट निकाल आणावे लागतील, असं मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठानं सांगितलं आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक विषयांच्या पदवी परीक्षा रद्द अथवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या आहेत. यावर आता वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनीही परीक्षा रद्द किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी केली जात होती. मात्र, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमाला अनुसरून नाही आणि न्यायालयानेही त्यास परवानगी दिलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब समजून घेऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी याआधीच केले होते.