Markadwadi Disputes : बॅलेट पेपरवर मतदान, मारकडवाडीत तणाव; 20 जणांना नोटीस
Markadwadi Disputes : बॅलेट पेपरवर मतदान, मारकडवाडीत तणाव; 20 जणांना नोटीस
ईव्हीएम मशीनवर शंका घेत माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळून लावल्यानंतरही आता आमदार उत्तम जानकर यांच्या गटाचे ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत तीन डिसेंबर रोजी मतदान घेण्यावर ठाम आहेत . यासाठी त्यांनी गावात प्रचाराला ही सुरुवात केली असून घरोघरी जाऊन मतपत्रिका दाखवत आपण वीस तारखेला ज्याला मतदान केले होते त्यालाच मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांनी कितीही प्रेशर आणलं तरी आम्ही लोक वर्गणीतून ही निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर पार पाडणार अशी जानकर गटाची भूमिका आहे.
मात्र आता प्रशासनाने मागणी फेटाळून लावल्यानंतर गावातील दुसरा विरोधी गट आक्रमक झाला असून गावातील जानकर गटाच्या चार पुढार्यांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता हा मतदानाचा निर्णय घेतला आहे. आम्ही यात सहभागी होणार नसून आमचा या मतदानावर बहिष्कार असल्याची भूमिका घेतल्याने या प्रकरणाला नवीन ट्वीस्ट मिळाला आहे . या मतदानामुळे गावातील वातावरण खराब झाल्यास किंवा गोरगरिबांना त्रास झाल्यास हे चार पुढारी जबाबदार असतील, असा इशाराही विरोधी गटाने दिला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने मतदानाची मागणी फेटाळून लावली असली तरी गावात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस प्रशासनावर ताण वाढू शकणार आहे.