Markadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठराव
Markadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठराव
एकीकडे राज्यात झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सर्व नेते EVM मशीनवर आक्षेप घेत असताना माळशिरस (Malshiras) तालुक्यातील मारकडवाडी गावाने आता थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. मारकडवाडी गावात आजवर शरद पवार गटाचे उत्तम जानकर (Uttam Jankar) यांना मोठे मताधिक्य मिळत आले होते. मात्र यावेळी विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांना मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या गावाने माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिले आहे.
या निवेदनात मौजे मारकडवाडीमधील चाचणी निवडणूक घेण्यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत, अशी मागणी केली आहे. यात गावात यंदाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात उत्तम जानकर यांना केवळ 843 मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाल्याचे सांगितले आहे. यापूर्वी झालेल्या 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत. यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत हे तपासण्यासाठी पुन्हा 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला आहे. यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत, अशी मागणी करीत संपूर्ण खर्च भरण्यास गाव तयार असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.