MARD Doctor Strike : मागण्या पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्रात संप सुरुच, डॉक्टरांचा इशारा
अनेक राज्यात मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेतला असला तरी, मागण्या पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्रात संप सुरुच राहणार आहे. सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश दहीफळे यांनी ही माहिती दिली आहे. नीट पीजी काऊन्सिलिंग प्रक्रिया सुरु करण्याच्या प्रमुख मागणीसह देशभरातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. 6 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीदरम्यान नीट पीजी काऊन्सिलिंगच्या प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलंय. त्यानंतर देशपातळीवरचा संप मागे घेण्यात आला. मात्र जोपर्यंत स्टेट काऊन्सिलिंगचा मुद्दा मार्गी लागत नाही, तसंच आरोग्य अधिकाऱ्याच्या जागा भरल्या जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रात संप सुरुच ठेवण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी घेतलाय. दरम्यान कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असताना संप पुकारणं कितपत योग्य आहे असा प्रश्नही उपस्थित केला जातोय.