Marathi Language : स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार आता मराठीत ; राज्य सरकारकडून कायद्यात सुधारणा
महाराष्ट्रात राहूनही प्रशासकीय कामात मराठीपासून पळवाटा शोधू पाहणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे... मराठी भाषेकडे दुर्लक्ष कराल तर आता कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. कारण ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, महापालिका आणि इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासकीय कार्यालयातील व्यवहार मराठीतून करण्याबाबत राज्य सरकार कायद्यात सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ, सिडको, म्हाडा यासारख्या प्राधिकरणांनाही आता आपला कारभार मराठीतच करावा लागेल. याबाबतचे सुधारणा विधेयक आज विधिमंडळात मांडण्यात येणार असल्याचं कळतंय. हे विधेयक संमत झाल्यास राजभाषा अधिनियमाच्या सर्व तरतूदी स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू होणार आहेत.