Maratha Reservation : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना धक्का, EWS आरक्षणाचा GR हायकोर्टाकडून रद्द
ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून राज्यातलं राजकारण आधीच तापलं असताना आता हायकोर्टाने मराठा समाजाला आणखी एक मोठा धक्का दिलाय. ईडब्ल्यूएस अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील राज्य सरकारचा जीआर मुंबई हायकोर्टाने रद्द केलाय. मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करत मोठा धक्का दिला होता. मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे राज्यातील मराठा समाजाच्या तरुणांना महावितरणच्या भरती प्रक्रियेत तात्पुरता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जीआर काढला. त्यानुसार ईडब्ल्यूएस अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र हायकोर्टाने हा जीआर रद्द केल्यानं राज्य सरकारच्या अडचणीतही आता मोठी वाढ झाली आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक होत रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्याचं मोठं आव्हान नव्या शिंदे-फडणवीस सरकारसमोर असणार आहे.