Maharashtra LIVE : Superfast News : 5 PM : सुपरफास्ट बातम्या : 7 Sep 2025 : ABP Majha

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावत, ओबीसींमध्ये घुसलेल्या सोळा टक्क्यांना बाहेर काढण्याची मागणी केली. आमचं भांडण ओबीसींशी नसून सरकारशी आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. सरकारनं कामं केल्यास कौतुक करू, असेही ते म्हणाले. जीआर योग्य असून गैरसमज पसरवू नका, असे आवाहन जरांगे यांनी केले. "ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना बाहेर काढा," असे जरांगे यांनी म्हटले आहे. जरांगे यांच्या मुंबई आंदोलनानंतर सरकारने दिलेल्या जीआरवरून राज्यातील मराठा समन्वयकांनी त्यांना धारेवर धरले आहे. मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांनी जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. जरांगे आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःची बुवाबाजी करत असून, मुंबई आंदोलनादरम्यान त्यांना शासनाने दिलेला ड्राफ्ट अगोदरच माहीत होता, असा आरोप लाखे पाटील यांनी केला. "मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्वच करत नाहीत, तर कुणबी समाजाचं नेतृत्व करतायत," असे लाखे पाटील म्हणाले. हैदराबाद संस्थानमधील कुणब्यांना आरक्षण मिळवणे हाच त्यांचा अजेंडा असल्याचा आरोपही त्यांनी केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. ओबीसी समाजात सध्या अस्वस्थता आहे. भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षण व्यवस्थेला नेहमीच विरोध केला आहे, असेही खरात यांनी नमूद केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, पण ते ओबीसींतून नको, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola