Maratha Andolan | आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहणार : मराठा आंदोलक
सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठा संघटनांचं आंदोलन सुरुच आहे. एक मराठा, लाख मराठाची घोषणा देत, काल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबईत एकाच वेळी वेगवेगळ्या 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. अशातच आज मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरात आज सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली आहे. माढ्यात तर रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सोलापुरात एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात आहे.
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षण स्थिगिती विरोधात आज बंद पुकारण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर देखील आंदोलनं करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात माढामध्ये उग्र स्वरूपाच्या निदर्शने करून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तर शहरात सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याघरासमोर आंदोलनसाठी कार्यकर्ते एकत्रित जमणार आहेत. शहरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे.