Manoj Jarange : शांतता रॅलीत दगडफेक करण्याची फडणवीसांच्या लोकांची इच्छा - मनोज जरांगे
Manoj Jarange : शांतता रॅलीत दगडफेक करण्याची फडणवीसांच्या लोकांची इच्छा - मनोज जरांगे
ओबीसी आरक्षण (OBC Reservation) हे शंभर टक्के धोक्यात आलं आहे. सत्तेतील निजामी मराठा हा ओबीसी आरक्षणावर उठल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केला होता. जरांगे पाटलांमुळे ओबीसींची मूठ आवळण्याचं जालीम औषध 40 वर्षांनंतर मिळाल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. आता यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिले आहे. कोण निजामी औरंगजेबी मला माहिती नाही. मला केवळ गरीब मराठा कळतंय, असे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, समाजाला भविष्य लक्षात आलं आहे. समाजाला कुठलीही अपेक्षा नाही, फक्त हक्काचे आहे ते मिळावे. सरकार बनवाबनवी करत आहे. वेळ काढूपणा करत आहे. गुन्हे मागे घेतले नाहीत, वेळ मारून नेत आहेत. अनेक टोळ्या जमवायला सुरु केलं आहे. मराठा संघटना फोडायला सुरु केलं आहे. आमिष देऊन फोडायला लागले आहेत. मराठ्यांची एकीकडे मरमर सुरु आहे. मात्र, काही बिकाऊ समन्वयक, संघटना यांनी जातीच्या विरोधात काम सुरु केलं आहे. हे सरकार घडवून आणायला लागले आहे. काही आमदार आणि मंत्रीही त्यासाठीच सोडण्यात आले असून हे सर्व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरु आहे, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
जातिवंत मराठा आता घरी बसू शकणार नाहीत
ते पुढे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रामधील मराठा बांधवांनी आम्ही एक आहोत हे दाखवून दिलं आहे. आमचं रक्त, जातं, खानपान सगळं एक आहे. पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे जमत नाही, हे विष पेरण्याचे काम राजकारणी लोकांनी केलं आहे. जातिवंत मराठा आता घरी बसू शकणार नाहीत. सोलापुरने टोक गाठलं, बोलणाऱ्यांचे नरडे दाबून टाकले. एकदिवस काम सोडल्याने काम कल्याण होतं असेल तर ते करावे, असे त्यांनी म्हटले.