Manoj Jarange Protest Plan : ट्रक्टर, ट्रक सह 10 लाख गाड्या; जरांगेंनी सांगितला उपोषणाचा प्लॅन
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघणार आहे. दरम्यान, त्यांचा हा दौरा कसा असणार याबाबत अनेक चर्चा सुरू आहे. या दौऱ्यात कोणती वाहनं असणार, जेवणाची सोय कशी असणार, मुंबईत राहण्याची सोय कशी असणार, तसेच मनोज जरांगेंच्या सोबत कोण कोणती लोक मुंबईच्या दिशेने निघणार. या सर्व प्रश्नांची उत्तरं खुद्द मनोज जरांगे यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना दिली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "समाजाला न्याय मिळावा म्हणून आता मुंबईला जावे लागणार आहे. आम्ही 20 जानेवारीला मुंबईला पायी निघणार आहोत. आंतरवाली सराटीमधून सकाळी 9 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. आंतरवाली सराटी ते मुंबई रूट कसा असणार यासाठी टीम नेमण्यात आल्या असून, दोन ते तीन टीम या सर्व मार्गाची पाहणी करण्यासाठी गेली आहे. आम्ही मुंबईकडे ट्रॅक्टर, ट्रक आणि सोबतच जे काही वाहनं मिळतील ते घेऊन निघणार आहे. सोबतच रस्त्यात मराठा समाजाचे जे काही पारंपारिक खेळ आहे, असे खेळ आयोजित करण्यात येतील. आनंद उत्साहा करत आम्ही मुंबईकडे जाणार आहोत.