Manikrao Kokate : भिकारी शासन आहे,शेतकरी नाही, स्पष्टीकरण देताना कोकाटेंची पुन्हा गल्लत
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही महिन्यांपूर्वी "भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एका रुपयामध्ये पीक विमा दिला. काही लोकांनी त्याचा गैरवापर केला," असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती, तर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता माणिकराव कोकाटे यांनी आपल्या त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. "शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना एक रुपया आम्ही देत नाही, म्हणजे भिकारी कोण? शासन आहे, शेतकरी नाही," असे वक्तव्य त्यांनी आज केले. एक रुपयाच्या विमा योजनेमुळे पाच ते साडेपाच लाख बोगस अर्ज सापडले असून, त्यापैकी चार लाख अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेत सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोकाटे यांनी सरकारविषयी केलेले हे वक्तव्य योग्य नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. शेतकऱ्यांना मदत करण्यासोबतच दरवर्षी पाच हजार कोटी रुपये शेतीत गुंतवणूक करणार असून, पुढील पाच वर्षांत पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक वाढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.