Chandrapur Tiger : वाघाचे फोटो काढण्यासाठी नसते उठाठेव, हौशी फोटोग्राफरचा व्हिडिओ व्हायरल
चंद्रपुरात वाघाचे फोटो काढताना हौशी फोटोग्राफर्स सैराट झाल्याचे पुन्हा एकदा उघड झालं आहे. वाघाचे फोटो काढण्यासाठी असलेले सर्व नियम धाब्यावर बसवून काही फुटांच्या अंतरावरून वाघाचे फोटो काढण्याची हौस पूर्ण केली जात असल्याचं एका वायरल व्हिडिओतुन स्पष्ट झालं आहे. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातील हा व्हिडिओ असून काही जण अगदी जवळून वाघाचे फोटो काढतांना दिसताय. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडलेले वाघ चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रात संचार करतात. त्यातही महाऔष्णिक वीज केंद्र हे ताडोबाच्या अगदी सीमेवर असल्याने या भागात वाघांची मोठी संख्या आहे. मात्र वाघाचे फोटो-व्हिडीओ काढण्यासाठी सर्व नियमांची पायमल्ली हौशी फोटो-व्हिडिओग्राफर्स करताहेत. या व्हायरल व्हिडिओत असलेली लोकं वाघांचा माग काढत त्यांचे फोटो-व्हिडीओ काढत असल्याचं स्पष्ट होतंय मात्र फोटो घेण्याची ही क्रेझ त्यांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे वाघांच्या या पॅपेराझिना शोधून वनविभागाने त्यांना आवर घालण्याची गरज व्यक्त होत आहे.