राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. पण, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतांचं दान महायुतीच्या पारड्यात टाकल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला राज्यातील जनतेनं स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता पुढच्या पाच वर्षांसाठी राज्यात महायुतीचंच सरकार येणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. अशातच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईतही मोठे यश मिळाले. मुंबईतील सर्वाधिक लक्षवेधी लढत असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह सदा सरवणकर यांचा दारुण पराभव झाला आहे.
दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघाचे मैदान मारल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित विजयी उमेदवार महेश सावंत त्यांनी सकाळपासूनच प्रभादेवी मधील चाळींमध्ये जाऊन मतदारांचे आभार मानायला सुरुवात केली आहे. "ज्या दिवशी मला उमेदवारी मिळाली त्याच दिवशी समोर जरी सदा सरवणकर, अमित ठाकरे यांच्यासारखे मोठे उमेदवार असले तरी माझा विजय होणार, याचा विश्वास मला कायम होता", असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय.