Nawab Malik यांचा राजीनामा न घेण्याची महाविकास आघाडीची भूमिका, कारवाईनंतर आज निषेध, आंदोलन, बैठक
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी कोठडी सुनावण्यात आलीय. पण त्यांचं मंत्रिपद मात्र कायम आहे. ईडीनं केलेल्या कारवाईनंतर महाविकास आघाडीनं संघर्षाचा पवित्रा घेतलाय. आणि मलिक यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका घेतलीय. एवढंच नाही तर या कारवाईचा निषेध तीनही पक्षाचे मंत्री आणि आमदार करणार आहेत. मंत्रालयासमोरच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर तीनही पक्षांचे नेते आंदोलन करून मलिक यांच्यावरील कारवाईचा निषेध करणार आहेत. तर पुढची रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादीनं आज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. नवाब मलिक यांना काल पहाटे 5 वाजता ईडीनं ताब्यात घेऊन चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात नेलं. काल पहाटे सुरु झालेल्या कारवाईचं नाट्य रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होतं. मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर मलिक यांची रात्र ईडीच्या कोठडीत गेली.