Urban Development Funds : Eknath Shinde यांच्या खात्याच्या निधीवर फडणवीस यांचा 'वॉच'? Special Report
राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार कार्यरत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याच्या निधी वाटपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मोठ्या निधीच्या वर्गवारीसाठी आता मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी आवश्यक असणार आहे. नगर विकास विभागाच्या निधी वाटपात शिवसेनेच्या आमदारांना आणि नगरसेवकांना झुकते माप दिले जात असल्याच्या मित्रपक्षांच्या तक्रारी होत्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या खात्याकडील निधी महत्त्वाचा ठरणार असल्याने, निधीचे समतोल वाटप होईल याची काळजी मुख्यमंत्री घेणार असल्याचे कळते. काँग्रेसने या निर्णयावर टीका करत, हा एकनाथ शिंदे यांना फडणवीसांचा झटका असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही तिन्ही पक्षात स्पर्धा सुरू असल्याचे नमूद केले. मात्र, "निधी वितरणाला अंतिम मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी असा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याचं सांगितलं जातंय." नियोजन विभागासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी असाच निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे समन्वय चांगले असून, सरकारमध्ये कोणताही वाद नसल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपनेही हे आरोप फेटाळत, मुख्यमंत्र्यांनी राज्याची आर्थिक घडी नीट ठेवण्यासाठी आणि आर्थिक शिस्त राखण्यासाठी हा आढावा घेतल्याचे म्हटले आहे. ग्रामविकास खाते भाजपकडे असल्याने, नगरविकास खात्याच्या निधी वाटपावर भाजपने लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जात आहे.