Sangamner News : संगमनेरमध्ये गस्त घालणाऱ्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, दगडफेक करत चेकनाक्याची तोडफोड

Continues below advertisement

संगमनेर : संगमनेर शहरात जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. संचार बंदी काळात गस्त घालत असताना दिल्ली नाका परिसरात गुरुवारी (6 मे) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी सहा जणांसह अज्ञात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याचे आणि गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

संगमनेरमध्ये संचार बंदी काळात पोलीस गस्त घालत होते. यावेळी दिल्ली नाका परिसरात जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या जमावाने पोलिसांनी तात्पुरत्या उभारलेल्या चेकनाक्याचीही तोडफोड केली. गस्त घालत असताना पोलिसांना काही लोक गर्दी करुन उभे असल्याचं दिसलं. यावेळी जमाव बंदीचा आदेश असताना गर्दी का केली अशी विचारणा करत पोलिसांनी त्यांना हटकलं. तसंच पोलिसांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले असता त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. मात्र यामुळे जमाव अचानक आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला करत दगडफेक केली. तसंच परिसरात उभारलेल्या चेकनाक्याची नासधूसही जमावाने केली.

जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. तर जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांचा पाठलाग केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले असून परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे. यामधून काही जणांची ओळख पटली असून विविध कलमानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती उपविभागीय आयुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram