Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात मुसळधार पावसामुळे काजळी नदीला पूर आला आहे. नदीकिनाऱ्यावरील दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. कालच्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रोहा तालुक्याला बसला. त्यानंतर महाड तालुक्यातील काही गावांमध्येही पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुंडलिका, अंबा, सावित्री या प्रमुख नद्या इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. रात्री झालेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग माणगावजवळच्या निकाळजे नदीच्या पाण्यामुळे ठप्प झाला होता. आता मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. निकाळजे नदीने धोका पातळी ओलांडून परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण केली होती. माणगाव तालुक्यातील खांदाड आदिवासी वाडीलाही पुराच्या पाण्याचा सामना करावा लागला. तेथे अडकलेल्या पंधरा नागरिकांना काल बाहेर काढण्यात आले. येत्या काही तासांत पावसाचा जोर असाच राहिल्यास रायगड जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.